अभिनंदनाच्या ठरावावरून मनपात प्रचंड गोंधळ; एमआयएमचे २० नगरसेवक निलंबित

Foto

औरंगाबाद: महानगरपालिकेच्या  सर्वसाधारण सभेत नवनिर्वाचित एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून गोंधळ उडाला. महापौरांकडून खासदारांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जात नसल्याने विरोधी पक्ष नेत्या सरिता बोर्डे व एमआयएमच्या नगरसेवकांनी महापौरांच्या डायससमोर प्रचंड   गोंधळ घातला. तर शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्‍नावर प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा या मागणीचा भाजपा सदस्यांनी आग्रह धरला. पण त्याकडे महापौर दुर्लक्ष करीत असल्याने भाजपाच्या सदस्यांनी राजदंड पळविला. गोंधळामुळे महापौरांनी एमआयएमच्या 20 नगरसेवकांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द केले. 

आचारसंहितेनंतर मनपाची आज पहिलीच सर्वसाधारण सभा होती. सभेला सुरुवात झाल्यानंतर भाजपाच्या सदस्यांनी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी दुसर्‍यांदा विराजमान झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावा मांडला. त्यास महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंजुरी दिली. त्यानंतर विरोधी पक्ष नेत्या सरीता बोर्डे यांनी औरंगाबादचे नवनिर्वाचित खासदार इम्तियाज जलील यांचेही सभागृहातर्फे अभिनंदन करावे, असा प्रस्ताव मांडला. त्याच वेळी काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांनी खासदारांच्या अभिनंदन ठरावास विरोध दर्शविला. त्यानंतर भाजपाचे सदस्य राजू शिंदे, बापू घडामोडे, दांडगे व अन्य सदस्यांनी शहरातील पाणी प्रश्‍नावर चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. एमआयएमच्या सदस्यांनी महापौरांच्या डायससमोर जमत महापौरांकडे अभिनंदन ठराव मंजूर  करण्यासाठी आग्रह धरला. तर भाजपा सदस्यांनी पाण्याच्या प्रश्‍नावर चर्चा व्हावी. शहरात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याचे मोठे संकट आहे. पण महापौर लक्ष देत नसल्याने भाजपाच्या सदस्यांनी राजदंड पळविला. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ उडाला. नगरसेवक अफसर खान यांनी भाजपा सदस्याच्या हातातील राजदंड आणून डायसवर ठेवला. हे सर्व सुरु असताना एमआयएम नगरसेवकांचा अभिनंदन ठराव मंजूर करण्याचा आग्रह कायम होता. अशातच एमआयएमच्या नगरसेवकाने राजदंड पळविला. वाढता गोंधळ लक्षात घेऊन महापौर घोडेले यांनी एमआयएमच्या विरोधी पक्ष नेत्या सरिता बोर्डे यांच्यासह पाच नगरसेवकांचे सदस्यत्व एक दिवसासाठी रद्द केले. सभेत सर्व गोंधळ सुरू असताना शिवसेनेचे सदस्य मात्र शांत होते. पाणी प्रश्‍नावरून भाजपाकडून सेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न  करण्यात आला.